पुणे – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात जड वस्तूने वार करत खून केला. त्यानंतर पती घटनास्थळावरून पळून गेला. उत्तमनगर पोलिसांचे पथक पतीच्या शोधासाठी रवाना झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी हवेली तालुक्यातील खडकवाडतील ढमढेरे पोल्ट्री फार्ममध्ये घडली.
पुजा तुषार ढमढेरे (वय 30) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, तुषार ऊर्फ बबलू राजाराम ढमढेरे (वय 35) याच्यावर गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी सांगितले, पुजा व तुषार यांचा विवाह 30 नोव्हेंबर 2011 रोजी झाला. बबलूचा खडकवाडी येथे ढमढेरे पोल्ट्री फार्म नावाने पोल्ट्रीचा व्यवसाय आहे.
पोल्ट्री शेजारील एका खोलीतच ते राहात होते. विवाहानंतर तो सतत पुजाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्याने तिला मोबाइल फोन वापरण्यास मनाई करून शिवीगाळ केली होती. तो तिला रविवारपासून सातत्याने त्रास देत होता, एकदा तिच्यावर चाकू घेऊन मारण्यास धाऊनही गेला होता.
दरम्यान, मंगळवारी त्याने तिच्या डोक्यावर कठीण वस्तूने वार करून खून केला. यानंतर तो घरातून पळून गेला. याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी पुजाच्या घरच्यांना दिली. यानंतर पुजाच्या घरच्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली.