नवी दिल्ली – प्रवाशांना आणखी आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी भारतीय रेल्वेने एक महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. आता लांब पल्ल्याच्या प्रत्येक गाडीतील सर्व डबे वातानुकूलित (एसी) करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रवाशांना रेल्वेचा प्रवास अत्यंत कमी दरात आणि आरामदायी करता यावा, यासाठी तर गेल्या सहा महिन्यांपासून प्रयत्न सुररू आहेत. आता याबरोबरच गाडीतील सर्वांसाठीच एसी यंत्रणा निर्माण केली जाणार आहे.
यापूर्वी केवळ टू–टीअर, थ्री–टीअर तसेच स्लिपिंग कोच या डब्यांनाच एसी सुविधा देण्यात येत होती. मात्र, आता नव्या योजनेनुसार जनरल डब्यांसह सर्वच गाडी एसी करण्यात येणार आहे. या योजनेनुसार स्लीपर कोच तसेच विना आरक्षित श्रेणीच्या डब्ब्यांचेही एसी कोचमध्ये रुपांतर होणार आहे.
रेल्वे कोचेस तयार करणाऱ्या कारखान्याला एक नमुना डबा तयार करण्याची सूचना करण्यात आली असून अशी एक संपूर्ण गाडी एसी करण्यात येणार आहे. त्याची चाचणी झाल्यावर अन्य गाड्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
डब्यातील आसनसंख्येतही वाढ होणार आहे. थ्री–टीएर बोगीत आता 72 ऐवजी 83 आसने ठेवली जातील. जनरल डब्यातील आसनसंख्या 105 केली जाणार आहे.