पुणे – डहाणूकर कॉलनीमधील एका पडीक इमारतीच्या रखवालदाराचा खून झाला. ही घटना 25 तारखेला उघडकीस आली. याप्रकरणी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अलंकार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दिलीप उर्फ रविंद्र रावण तावरे (47,रा.डहाणूकर कॉलनी लेन नंबर चारमधील पडीक इमारत) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार डहाणूकर कॉलनीमधील लेन नंबर चारमध्ये एक अर्धवट बांधकाम झालेली इमारत आहे. काही न्यायालयीन वादामुळे इमारतीचे काम पुर्ण होऊ शकले नसल्याची शक्यता आहे. या इमारतीत रविंद्र तावरे हा रखवालदार म्हणून काम करतो. तो त्याची आई व दोन मुलांसह तेथे रहातो. घटनेच्या दिवशी त्याची आई मुलांना घेऊन चर्चमध्ये गेली होती.
परत आल्यावर तीला इमारतीच्या जवळ रविंद्र हा बेशुध्दावस्थेत पडलेला दिसला. पोलिसांना पाचारण केल्यावर त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषीत केले. सुरवातीला अकस्मात मयताची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनाच्या अहवालात त्याचा गळा आवळल्याचे व दोन्ही हाताची हाडे मोडल्याने मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. यानंतर तातडीने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे करत आहेत.