कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूर येथील शाहूनगर गल्ली नं 10 मधील एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला विहिरीत टाकून हत्या केली. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित चिमुकलीला दोघा अल्पवयीन मुलांनी खाऊचे अमिश दाखवून काल सायंकाळी खांद्यावरून उचलून परिसरातील निर्जन स्थळी नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिला तेथील गोरखनाथ कुंभार यांच्या विहिरीत टाकले. त्यानंतर सायंकाळी मुलगी सापडत नसल्याने नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यावेळी ही अल्पवयीन मुलेही त्यांच्या सोबत होती. पण काहीही माहिती दिली नाही.
नंतर त्या मुलांनी विहिरीमध्ये मुलगी पडली असल्याचे सांगितले, तात्काळ नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. तर त्या ठिकाणी मुलीचा मृतदेह विहिरीमध्ये तरंगत असल्याचे निदर्शनास आल्याने चिमुकलीला काढून नातेवाईकांनी आयजीएम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र आयजीएम हॉस्पिटल च्या डॉक्टरांनी वरचेवर तपासणी करून मृत घोषित केले व नातेवाईकांना चिमुकलीचा मृतदेह घरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर चिमुकलीवर लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मात्र त्याच परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे या घटनेला वाचा फुटली व त्यांनी या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी पाहणी केली.संबंधित अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली.
लिंगायत स्मशानभूमीत दफन केलेला पीडित मुलीचा मृतदेह पोस्टमार्टेम साठी पोलिसांनी बाहेर काढून पोस्टमार्टेम रिपोर्ट च्या आधारे पुढील तपास करणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले. तर आयजीएम प्रशासनाने कालच ही गोष्ट गांभीर्याने घेतली असती तर वेळीच आरोपींना गजाआड करता आले असते. त्यामुळे पुन्हा एकदा आयजीएम हॉस्पिटल चा गलथान कारभार पहावयास मिळाला. त्यामुळे नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत आहे.