पुणे – कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामप्रकरणी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने नोटीस बजावली आहे. 30 दिवसांच्या आत बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
महापालिकेच्या नोटीस नुसार, “मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर विनापरवाना 251 चौ.मी. व तिसऱ्या मजल्यावरील 320 चौ.मी.चे संपूर्ण बांधकाम अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. बांधकाम विभागाचे उप अभियंता श्रीकांत गायकवाड यांनी ही नोटीस बजावली आहे. शहरात वेगवेगळ्या भागात अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू असताना महापालिका माजी खासदारांचे अनधिकृत बांधकाम काढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेने नोटीस बजाविलेली मिळकत काकडे यांच्या मालकीची असून, या ठिकाणी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेकडे तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. तसेच या प्रकरणी तक्रारदार योगेश कदम यांनी दोन दिवसांपूर्वी नव्याने निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे या तक्रारीसह इतर तक्रारींवर कारवाई होत नसल्याने तक्रारधारकांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची सातत्याने मागणी केली होती.
याची दखल घेऊन बांधकाम विकास विभागाने बुधवारी सदर बांधकामाचा पंचनामा केला. यामध्ये काकडे पॅलेस मंगल कार्यालयामध्ये बेकायदेशीररित्या तिसरा मजला बांधल्याचे दिसून आले. सदरील अनधिकृत बांधकाम 30 दिवसांत काढून घ्यावे, तसेच मिळकत पूर्ववत करावी अशी नोटीस महापालिकेने काकडे यांना बजावली असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.