पुणे -अवकाळी पावसाने शहराला सलग तिसऱ्या दिवशी टप्प्याटप्प्याने झोडपून काढले. सातारा रस्ता परिसरात झालेले पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने धनकवडीकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या मुख्य सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याची तळी साचली होती. पावसामुळे महापालिकेचे नियोजन “सपशेल फेल’ झाले असून, अवकाळीत ही स्थिती असेल, तर पावसाळ्यात काय होईल? या भितीने महापालिकेच्या पोटात आताच गोळा आला आहे.
आज, दुपारी अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. शहरात भवानी पेठ तसेच येवलेवाडी, कोंढवा, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, इंदिरानगर, आंबेगाव, सिंहगड रस्त्याच्या परिसरासह, वारजे, बावधन, पाषाण परिसरात धुव्वादार पाऊस झाला. दुपारी सव्वातीन ते साडेतीनच्या सुमारास दक्षिण पुण्यात तसेच बावधन परिसरात गारपीट झाली. अनेक ठिकाणी झाडे पडली. काही भागात सायंकाळी उशीरापर्यंत पाऊस सुरू होता. दरम्यान, हवामान विभागाने पावसाचा इशारा दिल्यानंतर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना पथके सज्ज ठेवण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात तयारी झालेली नाही.
अवकाळीसाठी कागदावरच तयारी…
अवकाळी पावसातच शहरात अद्याप पावसाळापूर्व कामेच झाली नसल्याचे उघड झाले. गेली तीन दिवस शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. परिणामी, अनेक भागात पावसाने पडलेल्या झाडांचा पाला कर्मचाऱ्यांकडून रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आल्याने हा झाडपाला पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरपर्यंत वाहत येऊन अडकून पडला आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास जागाच नसल्याने सातारा रस्ता-कर्वे रस्त्यावर अनेक भागात पाणी रस्त्याकडेला साचत आहे. गेली दोन दिवस पौड रस्त्यावर ठिकठिकाणी दिसणारे हे पाणी साचण्याचे चित्र शनिवारी सातारा रस्त्यावर दिसून आले. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके नेमलेली असली तरी तक्रार आल्यानंतरच ही पथके कार्यरत होत आहेत.
झाडपडीच्या 12 घटना…
बिबवेवाडी : अग्निशमन दलाकडे पाऊस व वारा यामुळे 12 झाडपडीच्या घटनांची नोंद झाली. सिंहगड रस्ता व एसएनडीटी या दोन ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंहगड रस्ता रस्ता व एसएनडीटी या दोन ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. बिबेवाडी, सहकार नगर, स्वारगेट, धनकवडी परिसरात गारपीट झाली तर येरवडा आणि लोहगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. ऊरुळी देवाची, सुस, बाणेर, पाषाण परिसरातही पावसाने हजेरी लावली.