कान्हे, (वार्ताहर) – कामशेत, पवना नगर रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून नागरिकांना त्यामुळे धुळीचा सामना करावा लागत आहे. कामशेत, पवनानगर रस्त्याने प्रवास करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.
रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याने नागरिक पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत. मात्र, हा रस्ता धुळीचा असून त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच पर्यायी मार्ग हा लोकवस्तीपासून दूरच्या अंतरावर असल्याने रात्रीच्या वेळेस नागरिकांसाठी तो धोकादायक आहे. हा रस्ता शेत, माळरानातून काढल्याने येथे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राहणारे नागरिकही त्रस्त झालेले आहेत.
कामशेत पवनानगर रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी या धुळीमुळे हैराण झाले आहेत. या धुळीचा रस्त्यालगत असलेले व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, किराणा दुकानदार त्रस्त झालेले आहेत.
कामशेतमध्ये खरेदीसाठी तसेच कामानिमित्त अनेक नागरिक येतात. त्यांच्या आरोग्यास या धुळीपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे . तसेच दुचाकी चालकांना डोळ्यात धूळ जाऊन किरकोळ असे अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ता लवकर पूर्ण करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.