पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर 23 जून रोजी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. अनेक मतदार मतदार याद्या पाहण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळ ओपन करत आहेत. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून महापालिकेचे संकेतस्थळ अतिशय “स्लो” झाले असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने https://www.pcmcindia.gov. या संकेतस्थळावर आगामी निवडणुकीसाठी शहरातील 46 प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिध्द केल्या आहेत. या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका व त्रुटी असल्याची ओरड शहरात सुरू झाली आहे. अनेक प्रभागातील नावे गायब झाली आहेत. तर, काही ठिकाणी इतर प्रभागातील नावे प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. माजी नगरसेवक, इच्छुक व राजकीय कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक मतदार प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही? हे संकेतस्थळावर जाऊन पाहत आहेत.
एका प्रभागाची लोकसंख्या कमीत-कमी 21 हजार ते जास्तीत-जास्त 52 हजार आहेत. त्यामुळे एका व्यक्तीने प्रभागाची मतदार यादी ओपन केली तर एका प्रभागाचे तब्बल चार ते साडेचार हजार पाने आहेत. त्यामुळे संकेतस्थळ ओपन होण्यास 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागत आहेत. याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा
लागत आहे.