पिंपरी, दि. 10 (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2022 या कालावधीत महापालिकेच्या विविध मैदाने, जलतरण तलाव, क्रीडासंकुले आदींसह शहरातील विविध शाळांच्या परिसरात या स्पर्धा पार पडणार आहेत. यामध्ये 14, 17, 19 अशा वयोगटातील मुले, मुलींच्या स्पर्धा रंगणार आहेत. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 2022-23 च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जय्यत तयारी सूर केली असून, स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
या स्पर्धांमध्ये सुमारे 49 खेळांचा समावेश आहे. यामध्ये क्रिकेट, टेबल टेनिस, बुद्धिबळ, शालेय फुटबॉल, कराटे, तलवारबाजी, किक बॉक्सिंग, बास्केटबॉल, स्क्वॅश, योगासन, रायफल शुटींग, बॉक्सिंग, थ्रोबॉल, खो खो, हॉलीबॉल, लॉनटेनिस, बॅडमिंटन, रोलर स्केटिंग, जलतरण व डायव्हिंग, वॉटरपोलो, जिम्नॅस्टिक्स, शुटींग बॉल, मल्लखांब, रोप मल्लखांब, टेनीक्वाईट, रोलर हॉकी, हॅंडबॉल, कॅरम, वेट लिफ्टिंग, नेटबॉल, सिकई मार्शल आर्ट, शालेय हॉकी, सायकलिंग, सॉफ्टबॉल, बॉल बॅडमिंटन, सेपक टकरा, तायक्वांदो, बेसबॉल, रग्बी, कुस्ती- फ्रीस्टाईल,ग्रिकोरोमन, ज्युडो, कबड्डी, सॉफ्ट टेनिस, रोल बॉल, धनुर्विद्या, वुशू आदी खेळांचा समावेश आहे.
शासकीय जिल्हा क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तसेच खेळाडूंच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैद्यकीय पथक, अँब्युलंस, सुरक्षा पथक यांच्यासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करुण देण्यात आले असल्याची माहिती प्रभारी क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी दिली.