मुंबई – भरधाव टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी गोदरेज गेट क्रमांक 1 जवळ हा अपघात झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. सिग्नल लागलेला असताना, तिथे उभ्या टँकरला हा भरधाव टेम्पो जाऊन धडकला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस व अग्निशमन विभागाचे जवान दाखल झाले. जयेश शिंदे वय 17, असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी गोदरेज गेट क्रमांक 1 जवळ काल रात्री अकराच्या सुमारास टेम्पो चालक प्रवीण शिंदे हे त्यांचा 17 वर्षांचा मुलगा जयेश आणि टेम्पोच्या मागे बसलेला कामगार राकेश यादव याच्यासह काही घरगुती साहित्य घेऊन घाटकोपरवरुन नाशिकला निघाले होते. मात्र पूर्व द्रुतगती मार्गावर गोदरेज गेट नंबर 1 च्या जवळ सिग्नल लागलेला असताना, तिथे उभ्या टँकरला हा भरधाव टेम्पो जाऊन धडकला. यात चालक प्रवीण आणि मागे बसलेला कामगार राकेश वाचले. मात्र टेम्पोच्या केबिनमध्ये बसलेला जयेशचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी विक्रोळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले होते. त्यांनी या तिघांनाही बाहेर काढून विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयात उपचारांसाठी नेलं, मात्र तिथे डॉक्टरांनी जयेशला मृत घोषित केलं. या अपघातामुळे सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. या घटनेचा पुढील तपास विक्रोळी पोलीस करत आहेत.