नवी दिल्ली : निर्भयावर बलात्कार घडला तेंव्हा तिच्या बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणात दोषी ठरवलेला मुकेशसिंह घटनास्थळावर उपस्थितच नव्हता. त्याला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी राजस्थानमधून ताब्यात घेतले, असा दावा दोषींना फाशी देण्याच्या आधी तीन दिवस मुकेशच्या वकीलांनी दिल्ली न्यायालयात केला.
तत्पुर्वी सोमवारी सर्वोच्च न्यायलयाने मुकेशच्या कायदेशीर प्रक्रिया पुन्हा पार पाडावी ही याचिका फेटाळून लावली. न्या. अरूण मिश्रा आणि शहा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने नऊ जुलै 2018 ला मुकेशची दुरूस्ती याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता.
या प्रकरणातील चारही आरोपींना शुक्रवारी 20 मार्चला पहाटे साडेपाच वाजता फासावर देण्यात येणार आहे. दोषींच्या कुटुंबियांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 13 पत्रे पाठवली आहेत. दोन पत्रे मुकेशच्या कुटुंबियांनी तर पावन आणि विनयच्या कुटुंबियांनी प्रत्येकी चार आणि अक्षयच्या कुटुंबियांनी तीन पत्रे पाठवली आहेत, अशी माहिती आता हाती येत आहे.