मुंबई – राज्यात करोनाबाधितांची संख्या ३९ वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या गोष्टी रद्द होत असल्या तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित पूर्वपरीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. यासंदर्भात एक पत्रक जारी करून माहिती देण्यात आली आहे.
पत्रकानुसार, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, ५ एप्रिल रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. योग्य ती काळजी घेऊन ही परीक्षा घेण्यात येईल. तसेच ३१ मार्च नंतर गरज पडल्यास त्याचा फेरआढावा घेऊन परिक्षेच्या वेळपत्रकाबाबत निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, करोनामुळे आज महाराष्ट्रात पहिला मृत्यू झाला आहे. तर देशात करोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व अभ्यासिका, ग्रंथालय, उद्याने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच स्पर्धा परीक्षांचे क्लासेसही बंद केले आहेत. त्यामुळे उमेदवारांपुढे अभ्यास कुठे करायचा, असा प्रश्न आहे. त्यातच करोनाचा संसर्ग शहरात वाढत आहे. परिणामी, त्यापासून सावध राहण्यासाठी घरी जाणेच योग्य राहील. ही भूमिका घेत बहुतांश उमेदवार घरी जाण्याचे पसंत केले आहे.