पुणे – महावितरण कर्मचाऱ्यांवर ग्राहकांकडूनच शिडी, बांबू अशी साधनसामुग्री उधारीवर घेण्याची वेळ आली आहे. खुद्द एका कर्मचाऱ्यानेच दै. “प्रभात’शी बोलताना ही माहिती दिली. जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रिवादळामुळे शहरातील अनेक भागांतील बत्तीगुल झाली होती. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या ओव्हरहेड वायरवर पडल्या होत्या.
त्या हटविण्याकरिता महावितरणकडे माणसे आहेत. मात्र, आवश्यक साधनसामुग्री नाही. फांदी हटवण्याच्या कामासाठी लागणारी शिडी, बांबू, घोडा (लहान शिडी) आदी साहित्य प्रशासनाकडून उपलब्ध होत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आमच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असल्यास महापालिकेचा उद्यान विभाग किंवा फायर ब्रिगेडकडून मदत घेतली जाते. मात्र, एखादी लहानशी फांदी ओव्हरहेड वायरवर कमी उंचीवर पडली असल्यास आमचे साहित्य वापरले जाते. साहित्याची टंचाई आहे किंवा कर्मचाऱ्यांना ती देण्यात येत नाही, असे मला वाटत नाही. तरीही याबाबत माहिती घेतली जाईल.
– निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे