पिंपरी – खंडीत वीजपुरवठा सुरळीत करीत असताना शॉक लागल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना नवी सांगवी येथे मंगळवारी (दि. 11) दुपारी घडली.
हनुमंत नागनाथ भिसे (वय 33, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) असे शॉक लागून मृत्यूमुखी पडलेल्या महावितरणच्या वायरमॅनचे नाव आहे.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवीच्या फेमस चौक परिसरातील वीजपुरवठा मंगळवारी सकाळपासून खंडित झाला होता. विद्युत केबलमध्ये झालेला बिघाड शोधण्याचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होते. दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास केबलचे काम करीत असताना हनुमंत भिसे यांना जोरदार शॉक लागला. ते जाग्यावरच बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
केबलचे काम करीत असताना या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र एखाद्या ठिकाणी जनरेटचा रिव्हर्स करंट आल्यामुळे शॉक लागला असावा, अशी शक्यता महाविरतणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे व्यक्त केली. याबाबत महावितरणकडून चौकशीचे काम सुरू आहे. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले.