पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सहाव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात अझीम काझी (53 धावा), दिव्यांग हिंगणेकर (नाबाद 46 धावा), निखिल नाईक (38 धावा) यांनी केलेल्या छोट्या पण महत्त्वपूर्ण धावांच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा 17 धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदवला.
या स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात छत्रपती संभाजी किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी किंग्ज संघाच्या रामेश्वर दौड (2-50), शमसुझमा काझी (1-23), हितेश वाळुंज (1-28) यांनी अचूक गोलंदाजी करत रत्नागिरीच्या सलामीच्या फलंदाजांना फारशी फटकेबाजी करू दिली नाही. त्यामुळे रत्नागिरी संघ 7 षटकात 3 बाद 41 असा अडचणीत सापडला. त्यानंतर अझीम काझीने 47 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार खेचत 53 धावा, तर निखिल नाईकने 25 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह 38 धावा केल्या.
या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 51 चेंडूत 69 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. हे दोघेही बाद झाल्यावर फलंदाजीस सहाव्या क्रमांकावर आलेल्या दिव्यांग हिंगणेकरने चौफेर फटकेबाजी करत 15 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 46 धावा चोपल्या, तर रोहित पाटीलने नाबाद 8 धावा काढून साथ दिली. दिव्यांग व रोहित यांनी पाचव्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी करून संघाला 8 बाद 173 धावांचे आव्हान उभारून दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना छत्रपती संभाजी किंग्ज संघाला 20 षटकात 8 बाद 156 धावाच करता आल्या. सलामवीर ओंकार खाटपेने एका बाजूने लढताना 47 चेंडूत 6 चौकार व 1 षटकारासह 53 धावा केल्या. ओंकार व ओम भोसले (धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 39 चेंडूत 46 धावांची भागीदारी केली. त्यानंतर संभाजी किंग्ज संघ 10.5 षटकात 5 बाद 77 धावा असा अडचणीत आला होता. विजयासाठी 13 चेंडूत 46 धावांची आवश्यकता असताना संभाजी किंग्जसाठी विजयाचे समीरकरण फारच अवघड होत गेले व रत्नागिरी जेट्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज संघावर 17 धावांनी विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स : 20 षटकात 5 बाद 173 धावा. (अझीम काझी 53, दिव्यांग हिंगणेकर नाबाद 46, निखिल नाईक 38, रामेश्वर दौड 2-50, शमसुझमा काझी 1-23, हितेश वाळुंज 1-28) वि. वि.
छत्रपती संभाजी किंग्ज : 20 षटकात 8 बाद 156 धावा. (ओंकार खाटपे 53, शमसुझमा काझी नाबाद 27, राजवर्धन हंगरगेकर 21, ओम भोसले 20, मुर्तझा ट्रंकवाला 13, प्रदीप दाढे 3-18, विजय पावले 2-34, दिव्यांग हिंगणेकर 1-30).