पैसे देऊन जमवली गर्दी?, भाजपच्या कार्यक्रमानंतर महिलांना पैसे वाटप

पिंपरी – शहर भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी महिलांना पैसे देऊन बोलविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहातच महिलांना पैशांचे वाटप करताना प्रसारमाध्यमांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना रंगेहात पकडले.

पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये रविवारी (दि.10) दुपारी रावसाहेब दानवे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यावेळी कुठलीच व्यवस्था न झाल्याने त्यांना भाजपाच्या कार्यालयात थांबवावे लागले. त्यानंतर परिसरातील महिलांनी सभागृहामध्ये गर्दी केली. या कार्यक्रमासाठी आजूबाजुच्या परिसरातील सुमारे 250 महिलांना बोलविण्यात आले होते.

कार्यक्रम संपल्यानंतर भाजपाचे काही पदाधिकारी आणि या महिला थांबल्या होत्या. यादी करून प्रत्येकी पाचशे रूपयाप्रमाणे त्याच ठिकाणी वाटप कऱण्यात येत होते. प्रसारमाध्यमांनी छायाचित्रे काढल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी नाष्टा आणि जेवणासाठी हे पैसे दिले असल्याची सारवा-सारव केली.

त्यानंतर या कार्यकर्त्याने तातडीने या बातम्या प्रसारित न करण्यासाठी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांचा दबाव प्रसारमाध्यमांवर आणण्याचा प्रयत्नही केला. शहरात एक खासदार, दोन आमदार, मंत्री दर्जाची तीन पदे, तर महापालिकेत तब्बल 77 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. तरी देखील गर्दी जमविता येत नसल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)