#Photo Gallery : पहिल्याच पावसात सातारकरांची दैना

पालिका, बांधकाम विभाग गाफील : पडक्‍या वाड्यांचे कारायचे तरी काय?

सातारा – गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा संपल्यानंतर रविवारी जिल्ह्यासह शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. एका बाजूला पाऊस आल्याचा आनंद शहरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर असतानाच दुसऱ्या बाजूला रस्त्यावर, घरात, दुकानात पावसाचे पाणी घुसल्याने पालिका प्रशासनाच्या तसेच बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात होता. पहिल्याच पावसात शहरात घुसलेल्या पाण्यामुळे पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे पितळ उघडे पडले आहे.

वळवाच्या पावसाने रविवारी साताऱ्यात हाहाकार उडवून दिला. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात सुमारे दोन तास कोसळलेल्या पावसाने जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले होते. सातारा शहर व उपनगरांत अनेक घरे पाण्याखाली गेली होती. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर वादळी वाऱ्याने विजेचे पोल वाकले होते तसेच घरांवरील छपरेही उडून गेल्याच्या घटना घडल्याने काही भागात बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाले होती.

साताऱ्यातील विसावानाका, सदरबझार, बॉम्बे रेस्टॉरंट, वाढेफाटा, राधिकारोड, भावानी पेठेत, शिवराज चौक, गोडोली नाका या सखल भागात तर या पावसाने दैना उडवली होती. अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले होते. सदरबझारमधील सैनिक स्कूलमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडल्याने बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पहिल्याच अवकाळी पावसात सदरबझार येथील हिरवाई समोरील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने पालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला गेला. बुध्दविहार येथेही हीच अवस्था निर्माण झाली होती. पावसाने बराच काळ दडी मारल्याने पालिकेच्या आरोग्य, बांधकाम विभागाला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसाळ्यातील समस्यांचे निराकरण करण्यास वाव होता. मात्र, या दोन्ही विभागांकडून अपेक्षीत कामे न केल्याने नागरिकांची पहिल्याच पावसात दैना उडाली. त्यामुळे या दोन्ही विभागांनी किमान आता तरी जागे व्हावे अशी आर्त हाक नागरिक करत आहेत.

सातारा :सातारा शहराच्या वैभवात भर टाकणारा आणि शहरातील वाहतुकीच्या समस्येवर पर्याय ठरणाऱ्या ग्रेड सेप्रेटरचे सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र रविवारी झालेल्या पावसाने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने भविष्यात हा मार्ग वाहतुकीस सुरू झाल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसांत याठिकाणी अशाच प्रकारे पाणी साठणार नाही ना? असा प्रश्‍न यानिमित्ताने सातारकरांसमोर उपस्थित झाला.

वादळामुळे झोपड्या उडाल्या हवेत

जिल्ह्यात रविवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सातारा शहरातही वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने राधिकारोड परिसरात असलेल्या झोपड्या वाऱ्यासोबत उडाल्या. यामुळे झोपडपट्टीधारकांवर निराधार होण्याची वेळ आली. दुसऱ्या दिवशी या झोपडपट्टीधारकांनी पुन्हा कसेबसे झोपड्यांची दुरुस्ती करून आपल्या निवाऱ्याचा प्रश्‍न सोडवला आहे. मात्र, पुन्हा अशा प्रकारे पाऊस आल्यास अशीच परिस्थिती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली पावसामुळे साठले तळे

रविवारी सायंकाळी साताऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली. साताऱ्याचे प्रवेशद्वार असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखालीदेखील या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.

पटवर्धनवाडा कोसळला

सातारा शहरात अनेक धोकादायक वाडे, इमारती आजही उभ्या आहेत. संबंधित मालकांना त्याबाबत पालिका प्रशासनाकडून नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. मात्र, यापुढे जाऊन कोणतीही कारवाई झालेली नाही. रविवारी झालेल्या पावसात अशाच प्रकारच्या पटवर्धनवाडा कोसळला. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही.

अन्‌ गोडोलीकर धास्तावले

गत काही वर्षांपूर्वी मान्सूनपूर्व पावसात हाच ओढा तुंबला होता. यावेळीही नागरिकांच्या घरांमध्ये तसेच दुकान गाळ्यांमध्ये पाणी साठले होते. काही ठिकाणी शॉर्टसर्किटच्याही दुर्घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे या घटनेनंतर संबंधित विभागाला शहाणपण येणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर आजपर्यंत या ओढ्याच्या साफसफाईसाठी तसेच ओढा तुंबू नये यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने रविवारच्या पावसात पुन्हा एकदा हा ओढा तुंबला अन्‌ गोडोलीकर धास्तावले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×