नगर – राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सुरू आहेत. अनेक ठिकाणी या निवडणुकी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील कर्जत येथील निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी भाजपच्या एका उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली होती. मात्र ज्या उमेदवारासाठी सुजय विखे आणि राम शिंदे यांनी सभा घेतली तो उमेदवार सायंकाळ होताच राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध निवडूण आणण्यात रोहित पवारांना यश आलं आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
रोहित पवारांच्या या खेळीमुळे भाजपची नाचक्की झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यावरून राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपचे उमेदवार शिबा तारेक सय्यद यांच्या प्रचारार्थ आपण आणि खासदार सुजय विखे पाटील यांची कॉर्नर सभा सकाळी 11 वाजता संपन्न झाली. मात्र संध्याकाळी 5 वाजता सय्यद यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. कर्जत – जामखेडचे विद्यमान आमदार यांचे हेच विकासाचे राजकारण का ?, असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच हा सत्तेचा दहशतवाद, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.