दुर्मीळ माऊंटन इंपेरियल पारवा आढळला कोयनेत

कोयना – “डिस्कव्हर कोयना टीम’च्या सदस्यांना दुर्मीळ असणारा माऊंटन इंपेरियल पारवा दिसून आला. अभ्यास दौर्‍यावर असताना अचानक या पक्ष्याचे दर्शन डिस्कव्हर कोयना टीमच्या सदस्यांना झाले. याला इंग्रजीत माऊंटन इंपेरियल पिंजन असे म्हणतात, तर शास्त्रीय नाव डुकुला बाडिया असे आहे.

माऊंटन इंपेरियल पिंजन या पक्ष्याची लांबी 43 ते 51 सें.मी. एवढी असते. याचे शेपूट लांब असून पंख जाड व गोलाकार असतात. याचा अंतर्भाग, डोळे व नाक राखाडी असून, मान पांढरट असते. पंख तपकिरी चॉकलेटी असतात. पंखांची खालील बाजू फिक्कट राखाडी असते व शेपूट काळसर असते. मार्च ते ऑगस्ट हा याचा विणीचा हंगाम असतो. याचे घरटे लहान झाडांवरती 5 ते 8 मीटर उंचीवर असते. त्यामध्ये या पक्ष्याची मादी 1 अंडे घालते. क्वचित प्रसंगी दोन अंडीदेखील घालतात. या पक्ष्याचे प्रमुख खाद्य फळे आणि बेरी हे आहे. हा पक्षी आशियातील भारतासह, बांगलादेश, भूतान, बुनया, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाऊस, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, थायलंड व व्हिएतनाम या देशात आढळतो. हा पक्षी हिमालयामध्ये 8370 फूट उंचीवरती आढळल्याची नोंद आहे.

पश्‍चिम घाटातील कोयना परिसर हा जैवविविधतेने बहरलेला आहे. येथे आढळणारे पक्षी, फुलपाखरे, साप, सरपटणारे उभयचर जीव व कीटक यासारख्या सजीवांचा अभ्यास करावा तेवढा कमी आहे. त्यामुळे याविषयी आपल्याला व आपल्यामार्फत समाजाला याची माहिती व उपयोग कळावा यासाठी डिस्कव्हर कोयना टीमच्यावतीने रोज अभ्यास केला जातोय. आठवड्यातून एकदा दिवसभरासाठी अभ्यास दौरा आखला जातो. या अभ्यासादरम्यान या पारव्याचे दर्शन झाले.

डिस्कव्हर कोयना टीममार्फत आजपर्यंत पक्षी, साप मिळून हजारो जीवांचे फोटो व रेकॉर्ड मिळवण्यात आले आहेत. यासाठी पक्षिमित्र संग्राम कांबळे, पक्षिमित्र महेश शेलार, सरपटणारे-उभयचर व कीटक अभ्यासक विकास माने, सर्प अभ्यासक निखिल मोहिते यांच्यासह सर्व टीम प्रयत्न करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.