बीड – बीडमधील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे आईचे मंदिर बांधण्यात आले आहे. सावरघाट हे गाव राष्ट्रसंत भगवानबाबा यांची जन्मभूमी आहे. तब्बल नऊ लाख रुपये खर्चून मुलांनी आपल्या दिवंगत आईचे मंदिर बांधले आहे.
राधाबाई शंकर खाडे यांचे मंदिर त्यांची मुले विष्णू, राजेंद्र आणि छगन खाडे यांनी बांधले आहे. या मंदिरात दिवंगत राधाबाई यांचे अत्यंत सजीव असे वाटणारे पावणे तीन फूट उंचीचे शिल्प तयार करण्यात आले आहे. या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे. अनेकजण हे मंदिर पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहे. परिसरासह राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरत आहे.
शेतकरी कुटुंबातील राधाबाई खाडे यांचे मागील वर्षी 18 मे 2022 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने खाडे कुटुंबाला मोठा धक्का बसला. या कुटुंबात त्यांचे पती शंकर खाडे यांच्यासह त्यांची तीन मुले, विष्णू, राजेंद्र आणि छगन तसेच विवाहित मुलगी आशा असे त्यांचे कुटुंब आहे.
राधाबाई यांच्या निधनानंतर एक महिन्यातच या तिन्ही भावंडांनी आपल्या दिवंगत ताईची स्मृती कायम असाव्यात असे काहीतरी करू असा विचार करून आपल्या जागेमध्ये आईचे भव्य मंदिर बांधण्याचा निश्चय केला. 10 बाय 13 च्या जागेत या मंदिराची उभारणी केली आहे.
आई म्हणजे प्रत्येकासाठीच सर्वस्व असते. जगातील कोणताही देव किंवा व्यक्ती ही आईची जागा कधीच घेऊ शकत नाही. सर्वात मोठे देवत्व हे आईमध्येच सामावलेले आहे. त्यामुळे आम्ही आईचे मंदिरच बांधण्याचा निर्धार केला व आईच्या आशीर्वादानेच आमचा हा संकल्प आता पूर्ण झाला आहे, असे मुलगा राजेंद्र खाडे यांनी म्हटले आहे.