अहमदनगर – आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीचाही करोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अकोले येथे घडली आहे. आता आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची दुःखद वेळ शिंदे कुटुंबियांवर आली आहे.
अकोले महाविद्यालयातील सेवा निवृत्त उपप्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे यांची ज्येष्ठ कन्या सुकृता हिचे आज पहाटे कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाले.
सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही आठ दिवसांपूर्वी करोनामुळे दुःखद निधन झाले होते. सुकृता हिने पत्रकारितेमध्ये पदवी प्राप्त केली होती. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार आज जग सोडून निघून गेली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आईच्या निधनानंतर सुकृता अस्वस्थ होती. तिच्यावरही कोरोनाचे उपचार सुरु होते. मात्र आईच्या जाण्याचा तिच्यावर फार मोठा आघात झाला होता. अखेर तिनेही आईपाठोपाठ प्राण सोडले.