पिंपरी – लॉकडाऊनच्या काळात बंद असलेले मोशी उपबाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार सोमवारी (दि. 20) मध्यरात्रीपासून सुरू होणार आहेत. मध्यरात्री एक ते सकाळी नऊ या वेळेत भाजीपाला व फळबाजाराचे व्यवहार सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. या कालावधीत फुलबाजार बंद राहणार आहे. तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून, या उपबाजारात व्यवहार करण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजार सोमवारी (दि. 13) रात्रीपासून शुक्रवारपर्यंत (दि. 17) बंद ठेवण्यात आला होता. या कालावधीत भाजीपाला, फळे व फुलांची खरेदी व विक्री बंद होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार, 17 तारखेनंतर कामकाज पुन्हा सुरू करायचा की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार होता.
मात्र, शनिवारी (दि. 18) पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामकाजाबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन, लॉकडाऊनच्या कालावधीत मोशी उपबाजाराच्या कामकाजाकरिता मध्यरात्री एक ते सकाळी नऊ हा कालावधी ठरविण्यात आला आहे. या कालावधीत शेतकरी आपल्या मालाची या उपबाजारात विक्री करू शकणार आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीकरिता कामकाजाच्या सोयीकरिता वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर, कामकाजाच्या वेळेत बदलाची माहिती शेतकऱ्यांना कळविण्यात येईल, अशी माहिती नागेश्वर उपबाजारातील सूत्रांनी दिली.