मुंबई – अमेरिकेत अपेक्षेइतकीच म्हणजे 0.75 टक्के व्याजदर वाढ करण्यात आली आहे. आगामी काळामध्ये कमी व्याजदर वाढीचे संकेत देण्यात आल्यानंतर अमेरिकेसह जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक उंचावले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही होऊन भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढून तीन महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेले.
गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,041 अंकांनी वाढून 56, 857 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 287 अंकांनी म्हणजे 1.73 टक्क्यांनी वाढून 16,929 अंकावर बंद झाला.
अमेरिकेची व्याजदर वाढ मंदावणार असल्यामुळे आता भारतामध्ये परदेशी गुंतवणूक येण्याची शक्यता वाढल्याने रुपयाच्या मूल्यात वाढ होत आहे. बजाज फिन्सर्व, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बॅंक, इंडसइंड बॅंक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, नेसले, एशियन पेंट्स, विप्रो, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात चार टक्क्यापर्यंत वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.
बॅंकिंग, माहिती तंत्रज्ञान, धातू, ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांक वाढले. जुलै महिन्यामध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केवळ 10,368 कोटी रुपयांचे शेअरची विक्री केली. आहे जून महिन्यामध्ये या गुंतवणूकदारांनी 50,2003 कोटी रुपयांच्या शेअरची तर मे महिन्यामध्ये 39,993 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती.
आज गुंतवणूकदारांनी ब्लूचिप कंपन्याबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी केली. सकाळच्या सत्रात रुपयाचा भाव 26 पैशांनी वाढल्यानंतर देशातील गुंतवणूकदारांना बराच आधार मिळाला. दरम्यानच्या काळामध्ये गुंतवणूकदारांना रिझर्व बॅंक कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये व्याजदरात कमी वाढ करू शकते असे वाटत आहे. कारण दरम्यानच्या काळामध्ये महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. ही आकडेवारी जर सकारात्मक राहिली तर रिझर्व बॅंक कमी आक्रमक पत धोरण राबवू शकते असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे.