पुणे – नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) रविवारी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे. तर सोमवारी (दि.1) मान्सून केरळमध्ये तर दि. 8 रोजी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
‘अम्फान’ चक्रीवादळामुळे 17 मे रोजी मान्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र, हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर मान्सूनची प्रगती थांबली होती. बुधवारी (दि.27) मान्सूनने उत्तरेकडे वाटचाल सुरू झाली. गुरूवारी (दि. 28) दुसऱ्याच दिवशी मान्सूनने संपूर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली. मात्र, त्यानंतर वाऱ्यांनी पुढे चाल केलेली नाही.
अरबी समुद्रातुनही मान्सून प्रगती करत असून, मालदीव आणि कोमोरीनसह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विशेषत: कोकण-गोवा आणि मध्यमहाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील दोन दोवस आकाश ढगाळ राहील व पावसाच्या सरी पडतील.