नागठाणे – लॉकडाऊन शिथिल केल्याने नागठाणे बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. जणूकाही दररोजच आठवडा बाजार भरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या गर्दीचा फायदा घेत, बाहेर गावावरुन आलेले आणि हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का असणारे अनेकजण बाजारपेठेत मोकाट फिरु लागले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्रामस्थही चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान, मोकाट फिरणाऱ्यांना आवारा, अन्यथा आम्ही दुकाने बंद करतो असे गाऱ्हाणे व्यापारी वर्गाने ग्रामसुरक्षा समितीकडे मांडले आहे. त्यामुळे ग्रामसुरक्षा समितीने नागठाणे बाजारपेठ अनिश्चित काळासाठी पूर्ण बंद केली आहे.
सातारा व पाटण तालुकातंर्गत अनेक लोक आपल्या मूळ गावात परतत आहेत. त्यांना होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय अन्य राज्य, जिल्ह्यातून येताना संबंधितांची आरोग्य तपासणी व अधिकृत परवाने असल्याशिवाय त्यांना तालुक्यात प्रवेश दिला जात नाही. तालुक्यात येणाऱ्यांनी आपली माहिती स्थानिक प्रशासनाला देवून त्याची अधिकृत नोंद व हातावर शिक्का मारून होम क्वारंटाइन होणे त्यांच्यावर बंधनकारक करण्यात आले आहे. इतर राज्य व अन्य जिल्ह्यातून सातारा व पाटण तालुक्यात येणाऱ्यांची संख्या हजारात आहे.
चोरीछुपे येणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. असे असताना कोणी बेकायदेशीरपणे आला तर संबधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनमधील शिथिलतेमुळे बहुतांशी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीत ज्या लोकांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आले आहेत, असे लोकही बिनधास्तपणे फिरत आहेत. त्यांच्यामुळे करोनाचा फैलाव होऊ शकतो. अशावेळी एक रुग्ण जरी सापडला तरी बधितांची भलीमोठी साखळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागठाण्याची परिस्थिती वनवासमाची सारखी व्हायला वेळ लागणार नाही? त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
नागठाणे गावातील ग्रामस्थांना काळविणेत येते की, आपल्या गावात एकही करोना रुग्ण नसून अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच आपल्या गावात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आपली स्वतःची जबाबदारी आहे की, कारणाविना घराबाहेर पडू नये, एकत्रित घोळक्याने कट्ट्यावर बसू नये, मास्कचा वापर नियमित करा. तसेच नागठाणे गावामध्ये बाहेरील जिल्ह्यातून/राज्यातून आलेल्या लोकांनी स्वतः घरातच 14 दिवस रहावे. बाहेर दिसल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सचिन पवार, ग्रामविकास अधिकारी, नागठाणे