शिरवळ -मुंबईहून अजनूज (ता. खंडाळा) येथे येणारी महिला करोना संशयित आढळल्याने शिरवळ (शिंदेवाडी) चेकनाक्यावरून तिला थेट सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिच्या स्त्रावाचे नमुने तपासल्यानंतर ती करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. तिच्यासोबतच्या दोन मुलांनाही विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच पाडळी येथेही मुंबईतून आलेला युवक करोनाबाधित निष्पन्न झाल्याने खंडाळा तालुका पुन्हा एकदा हादरला आहे.
मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेऊन आलेल्या खंडाळा तालुक्यातील 58 वर्षीय महिलेचा अहवाल करोनाबाधित आल्याने या महिलेला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णावर मुंबई येथे उपचार झाल्याने तिची गणना मुंबई येथे केली असल्याने या जिल्ह्यात गणना केली जाणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले आहे. अजनूज हे मूळ गाव असणारी व मुंबईतून आलेल्या या महिलेचा खंडाळा तालुक्यात कोणाशीही संपर्क आला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे.
ग्रामस्तर कमिटीच्या माध्यमातून या सर्वांवर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती अजनूजच्या सरपंचानी दिली. यापूर्वी खंडाळा तालुक्यातील महिला परदेशातून आल्यावर ती करोनाबाधित आढळली होती. ती करोनामुक्त झाली. त्यानंतर कोरियात गेलेली महिलाही बाधित झाल्याने खंडाळा येथील तिच्या संपर्कातील लोकांनाही क्वारंटाइन करण्यात आले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. त्यामुळे खंडाळकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. गेले महिनाभर खंडाळकरांनी स्वतःहून बंद पाळल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प होते. पारगांव, खंडाळा परिसर नुकताच कंटेटमेंट झोनमधून वगळला आहे. त्यातच सोमवारी मुंबईतून आलेली व्यक्ती करोनाबाधित असल्याचे कळताच खंडाळकरांचे धाबे दणाणले आहेत.