Mohammed Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ( Mohammed Shami) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 9 जानेवारीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे मोहम्मद शमीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मोहम्मद शमी याच्यासह 26 जणांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.
अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मोहम्मद शमीला विचारले असता तो म्हणाला की ‘हा पुरस्कार एक स्वप्न आहे, अनेकांचे आयुष्य निघून जाते आणि हा पुरस्कार जिंकू शकत नाहीत. या पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे.’ यापूर्वी शिखर धवनला 2021 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.
मोहम्मद शमीने गेल्या काही काळापासून टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. शमीने एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. तो भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याच्या या चमकदार कामगिरीमुळेच त्याला अर्जुन पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
#WATCH | Delhi: Mohammed Shami received the Arjuna Award from President Droupadi Murmu at the National Sports Awards. pic.twitter.com/znIqdjf0qS
— ANI (@ANI) January 9, 2024
पुन्हा मैदानावर परतण्याबाबत तो म्हणाला की, “दुखापत होणे हा खेळाचा एक भाग आहे. प्रत्येक खेळाडूचे नेहमी मैदानात असण्याचे स्वप्न असते. खेळाडूही लवकरात लवकर मैदानात परतण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, लोकांनी मला दिलेल्या प्रेमाचा मी ऋणी राहीन. व्यक्तीने नेहमी सकारात्मक मानसिकतेने मैदानात उतरावे.” सध्या त्याच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, यावेळी चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन) आणि रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन) यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.