नवी दिल्ली – आगामी काळात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेशातील निवडणूक सगळ्यात लक्षवेधी ठरत आहेत. त्यातच उत्तर प्रदेशात धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणात होत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी धार्मिक विधानं करण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक अजब विधान केलं आहे. सुरेंद्र सिंह यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना औरंगजेबाची तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे.
सुरेंद्र सिंह म्हणाले की, ओवेसी यांच्या नसांमध्ये जिन्नाचे रक्त वाहतं. ओवेसी देशाचं विभाजन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ओवेसी आधुनिक औरंगजेब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शिवाजी महाराजांचे अवतार असल्याचं वादग्रस्त विधान सुरेंद्र सिंह यांनी केलं.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर देखील टीका केली.