पुणे – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या दोन संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्तता दर्जा प्राप्त झाला आहे. संस्थेची अन्य महाविद्यालये स्वायत्तता दर्जासाठी पुढे येत आहेत. आता संस्थेचे पुढचे पाऊल क्लस्टर युनिव्हर्सिटीकडे (समूळ विद्यापीठ) राहणार आहे, अशी माहिती प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. जोत्स्ना एकबोटे, सचिव प्रा. शामकांत देशमुख, उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे, प्राचार्या कल्याणी जोशी, डॉ. विजयालक्ष्मी श्रीनिवास, डॉ. राजेंद्र झुंजारराव, डॉ. संजय थोरातसह आदी उपस्थित होते. आतापर्यंत संस्थेच्या चार महाविद्यालयांना स्वायत्तता दर्जा मिळाला आहे. आणखी तीन महाविद्यालये स्वायत्ततेच्या अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, आतापर्यंत या संस्थेची निम्मी महाविद्यालये स्वायत्त झाली आहेत.
डॉ. गजानन एकबोटे म्हणाले,
“आता संस्था क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी प्रयत्न करणार आहे. या विद्यापीठाच्या मसुद्यावर सर्वाधिक सूचना मी मांडल्या आहेत. यासंदर्भात आज उच्च शिक्षणाचे सचिव डॉ. विकासचंद्र रस्तोगी यांच्याशी चर्चा झाली. क्लस्टर विद्यापीठाबाबत काही अटी शिथिल करण्याबाबत ते सकारात्मक आहेत. संस्थेच्या फिजिओथेरपी आणि ऍग्रिकल्चर महाविद्यालयांचा समावेश क्लस्टर युनिव्हर्सिटीत व्हावा, यासाठी संस्था आग्रही आहे. तसे झाले तर क्लस्टर विद्यापीठासाठी संस्थेकडून त्वरित पाऊल उचलले जातील.’
“नवीन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय शिक्षणाला महत्त्व देण्यात आले. त्यासाठी महाविद्यालये स्वायत्त होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संस्थेची वाटचाल सुरू आहे. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत स्वायत्तता दर्जामुळे येत्या काही वर्षांत उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल होतील, असा विश्वास आहे. खेळण्याचाही लाभ होईल.” – डॉ. गजानन एकबोटे कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी