नगर- केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून खास नगर जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या फिरते पशुवैद्यकीय पथकास चालक उपलब्ध होत नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून ही वाहने धुळखात पडून आहेत. जिल्ह्यात आठ वाहने मिळाली असून त्यापैकी एक वाहन राहाता पशुवैद्यकीय कार्यालयात तर उर्वरित सात वाहने उपायुक्त पशुवैद्यकीय कार्यालयाच्या आवारात चालकाच्या प्रतीक्षेत आहेत.
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमांत तब्बल आठ फिरते पशुवैद्यकीय पथक वाहनाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थित गेल्या महिन्यात झाले. अत्याधुनिक सेवा व सुविधासह सर्वच उपचार करण्याची व्यवस्था या वाहनामध्ये आहे. या फिरते पशुवैद्यकीय पथक वाहनाची किमत 17 लाख रुपये आहे. अशी आठ वाहने नगर जिल्ह्यास उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारच्या पशुपालन व डेअरी विभाग व महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग या संयुक्त विद्यमान हे पथक उभारण्यात आले आहे.
या फिरत्या पशुवैद्यकीय वाहनात एक पशुवैद्यकीय अधिकारी, एक पशुधन पर्यवेक्षक व चालक असे तीन जण राहणार असून तालुकास्तरावर हे पथक काम करणार आहे. संबंधित तालुक्यात किमान दररोज 50 किलोमीटर प्रवास करून पशुधनावर उपचार व लसीकरण करणार आहे. पशुवैद्यकीय अधिकारी तालुकास्तरावर आहेत. मात्र हे वाहन चालविण्यासाठी चालक नसल्याने फिरते पशुवैद्यकीय पथकाचे वाहन सध्या उभे आहेत. कंत्राटी पद्धतीने वाहनचालकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चालकास 15 हजार रुपये महिन्यास वेतन देण्यात येणार आहे. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.