पिंपरी – महापालिकेच्या स्टाफ नर्स, पॅरामेडिकल स्टाफ व इतर कर्मचा-यांचा हक्काचा बोनस रोखून ठेवल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. याच्या निषेधार्त सांगवी, थेरगाव, यमुनानगर आणि जिजामाता रुग्णालयात सोमवारी (दि. ११) दिवसभर आंदोलनात करण्यात येणार आहे. या आंदोलनात कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष रुपेश पटेकर यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात २०२१ ते २०२३ साठी स्टाफ नर्स व इतर कर्मचारी भरण्यात आले. हे कर्मचारी रुग्णालयात प्रामाणिकपणे रुग्णसेवा करत होते. तरीही, गेल्या दोन वर्षांपासून ठेकेदाराने त्यांना दिवाळी बोनसची रक्कम दिली नाही. यासंदर्भात मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष रुपेश पटेकर यांनी वैद्यकीय विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकरी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना निवेदन दिले. आयुक्तांकडेही याबाबत पाठपुरावा केला. तरीही, संबंधित ठेकेदाराने बोनसची रक्कम कर्मचा-यांना दिली नाही. त्यामुळे रुग्णसेवा करणा-या कर्मचा-यांवर अन्याय झाला आहे.
यामुळे ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाच्या निषेधार्त सोमवारी (दि. ११) सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत रुग्णालयांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. स्टाफ नर्स, पॅरामेडिकल स्टाफ तसेच इतर कर्मचारी असे ७५० कर्मचारी डोक्याला काळी रेबीन बांधून आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे पटेकर यांनी सांगितले. सांगवी रुग्णालयात सकाळी साडेआठ, जिजामाता रुग्णालयात सकाळी साडेनऊ, थेरगाव आणि यमुनानगर रुग्णालयात सकाळी साडेदहा वाजता आंदोलन सुरु होईल. सायंकाळी पाच वाजता आंदोलन संपेल, असे अध्यक्ष पटेकर यांनी सांगितले.