सातारा, (प्रतिनिधी) – पक्ष जो उमेदवार देईल त्यांचे काम प्रामाणिकपणे करत त्याला निवडून देणार असे सांगणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उदयनराजे भोसले यांच्या शक्तिप्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा व जावली येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना गुरुवारी होणाऱ्या शक्तिप्रदर्शनासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा व जावली मतदारसंघ आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या एकहाती वर्चस्वामुळे भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. या मतदार संघात खा उदयनराजे प्रत्यक्ष मताधिक्क्य किती घेणार हा खरा उत्सुकतेचा प्रश्न आहे. पक्षश्रेष्ठींना शब्द दिल्याप्रमाणे उदयनराजे यांच्या शक्तिप्रदर्शनासाठी शिवेंद्रसिंहराजे यांची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिवसाला सुरूचीवर जाऊन केलेले बेरजेचे राजकारण व शिवेंद्रसिंहराजे यांची निवडणूक सज्जता यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सातारा विधानसभा मतदार संघातून ऑल इज वेलचा संदेश गेला आहे.
गुरुवार दि. १८ रोजी महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सातारा आणि जावली तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठीची नियोजन बैठक आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुची कार्यालय येथे घेण्यात आली.
सातारा-जावलीची ताकद दाखवा
या बैठकीला सातारा आणि जावली तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रत्येक गावातून, शहरातील वॉर्डातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले पाहिजेत, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. सर्वांनी सकाळी गांधी मैदान येथे उपस्थित राहावे.
उमेदवारी अर्ज भरताना विराट शक्तिप्रदर्शन झाले पाहिजे, त्यामुळे उद्याच्या रॅलीत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग सातारा आणि जावली तालुक्यातून झाला पाहिजे. सातारा आणि जावली तालुक्यातील भाजपची ताकद काय आहे हे उद्या आपण दाखवून द्यायचं, यात कुठेही कोणीही कमी पडू नये, अशा सूचना सर्वांना केल्या.