मुंबई – आमदार प्रताप सरनाईक हे मंगळवारी बाहेर गावावरून आल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. होम क्वारंटाईन असल्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीच्या चौकशीकरता उपस्थित राहता येणार नाही. त्याचप्रमाणे विहंग सरनाईक यांच्या पत्नी आजारी आहेत.
त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे पुढील आठवड्यात प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना एकत्र चौकशीसाठी बोलवावे, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडी अधिकाऱ्यांना केली आहे.
प्रताप सरनाईक म्हणाले, विहंगसोबत फोनवरुन बोलणे झाले आहे. ईडीने त्याला व्यवसायासंबंधी अनेक प्रश्न विचारले. टॉप्स नावाची एक एजन्सी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या मालकाचे आणि आपले काही आर्थिक संबंध, व्यवहार आहेत का? अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले. त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही.
एक सुरक्षा एजन्सी म्हणून त्यांची ओळख आहे. आमच्या कार्यक्रमात त्यांचे सुरक्षारक्षक ठेवत असतो. त्याचे रितसर पैसेही दिले आहेत. माहिती विचारली तर देऊ, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीने छापा टाकला होता. त्यांचे पुत्र विहंग यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. प्रताप सरनाईक यांना बोलावण्यात आले होते. मात्र होम क्वारंटाईन असल्यामुळे ते गेले नाहीत. ईडीने सरनाईक यांच्या मालमत्तेवर छापे टाकले होते.