मुंबई –निर्देशांक विक्रमी पातळीवर गेल्यानंतर बऱ्याच गुंतवणूकदारांनी तुफान नफेखोरी केल्यामुळे शेअरबाजार निर्देशांक बुधवारी मोठ्या प्रमाणात कमी झाले.
निर्देशांक उच्च पातळीवर असताना जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आल्यानंतर किरकोळ गुंतवणूकदारांनी बरीच विक्री करून नफा काढून घेतला. बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा
निर्देशांक सेन्सेक्स 694 अंकांनी म्हणजे 1.56 टक्क्यांनी कमी होऊन 43,828 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 196 अंकांनी कमी होऊन 12,858 अंकांवर बदल झाला.
गेल्या आठवड्यातील तेजीत ज्या कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात वाढले होते, त्या कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. कोटक बॅंक, ऍक्सिस बॅंक, सन फार्मा, एचडीएफसी बॅंक, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स या कंपन्यांना नफेखोरीचा फटका बसला. तर विक्रीच्या वातावरणातही ओएनजीसी, पॉवर ग्रीड, इंडसइंड बॅंक या कंपन्यांचे शेअर वधारले.
गुंतवणूकदारांचे नुकसान
बुधवारी शेअरबाजार निर्देशांक दीड टक्क्यांनी कोसळल्यामुळे शेअरबाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य एकाच दिवसात 2.24 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. त्यामुळे या प्रमाणात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.
गुंतवणूकदार सावध राहणार
बाजाराच्या कामकाजाबाबत अँजेल ब्रोकिंगचे विश्लेषक समित चव्हाण म्हणाले की, प्रदीर्घ काळाच्या तेजीनंतर अपेक्षेप्रमाणे गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. सकाळी निफ्टी 13,145 अंकांपर्यंत वाढल्यानंतर दिवसभर विक्री होत राहिली. या वर्षात असा प्रकार अनेक वेळा घडला आहे. निर्देशांक उच्च पातळीवर गेल्यानंतर नफेखोरी होते. तरीही हा प्रकार असाच चालू राहण्याची शक्यता कमी आहे. मात्र, किमान एक आठवडा तरी शेअरबाजार निर्देशांकामध्ये मोठे चढ-उतार होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत निफ्टी 13,050 पर्यंत वाढू शकतो. मात्र, परिस्थितिजन्य कारणामुळे विक्री झाल्यास निफ्टीला 12,800 अंकावर मोठा आधार आहे. नफेखोरी चालूच राहील असे न समजता धीर धरून गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेण्याची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले.