(विवेकानंद काटमोरे ) हडपसर, मतदार संघातील अनेक गावांचा समावेश महापालिकेत झाला आहे. ही गावे हडपसर मतदारसंघात आली आहेत. पुणे – सोलापूर महामार्ग, पुणे – पंढरपूर पालखी मार्ग हे महत्वाचे रस्ते हडपसर मतदारसंघातून जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिक आहे. साडेआठ हजार कोटींचा पुणे मनपाचा अर्थसंकल्प आहे. पण या समाविष्ट गावांसाठी मात्र अवघे १०० कोटी देऊन तोंडाला पाने पुसली आहेत. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंढवा – केशवनगर येथे उड्डाणपूल करणे आवश्यक असून ससाणेनगर, सय्यदनगर येथे रेल्वे पूल, रस्त्यांचे रुंदीकरण केल्यास वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. या विषयांसह शहर व हडपसर मतदार संघातील १३ महत्वाचे प्रश्न आमदार चेतन तुपे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मांडले.
पुणे शहर व हडपसर विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्न विधानसभेत मांडले त्याविषयी अधिक माहिती देताना आमदार चेतन तुपे पाटील म्हणाले की मनपाच्या गलथान कारभारामुळे हडपसरकरांना मनस्ताप होत आहे. यासाठी राज्य सरकारने पुणे मनपाला सूचित करावे. विकासकामांबाबत सातत्याने अन्याय, निधी वाटपातील असमतोल यामुळे पूर्व भागाची स्वतंत्र महानगरपालिका असावी. हडपसर विधानसभा मतदारसंघात पुणे शहरातील कचरा प्रकल्प सुरू असतानाच आता यासोबतच कुत्र्यांसाठीचे प्रकल्पही रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये आणण्याचा घाट घातला जातो आहे. तिथल्या व्यावसायिकांनी हा सर्व त्रास सहन करत कसा व्यवसाय करायचा असा सवाल त्यांनी विधानसभेत केला. शहराच्या चारही भागात कचरा जिरला गेला तर प्रकल्पावर येणारा ताण कमी होईल, आरोग्याचे, वाहतुकीचे प्रश्न निर्माण झाले आहेत ते कमी होतील असे म्हणणेही विधानसभेत त्यांनी मांडले. केशवनगर भागात प्रजिमा ३४ हा रस्ता तिथे प्रस्तावित आहे. परंतु अद्याप हा नकाशावरच आहे. या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडी कधी दूर होणार ? अशी विचारणाही आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत केली. याशिवाय एसआरए प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बिल्डरांना वेळेची मर्यादा द्यावी.
अनेक बांधकाम व्यावसायिक प्रकल्प घेतात आणि रहिवाशांच्या परवानगी वगैरे घेऊन काहीच हालचाल न करता जैसे थे परिस्थिती ठेवतात. यासाठी विशेष सुधारणा करण्याची गरज आहे. या बिल्डरना ठराविक काळासाठीच परवानगी देण्यात यावी. निर्धारित वेळेत एसआरए प्रकल्प पूर्ण न केल्यास त्यांची परवानगी रद्द करण्यात यावी. गोरगरीबांना आशेला लावून त्यांची फसवणूक करण्याचा अधिकार कुणालाही नाही. निर्धारित वेळेत प्रकल्प करण्याची मर्यादा दिल्यास प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल आणि एसआरए प्रकल्प अधिक प्रभावी होईल. याकडेही आमदार तुपे यांनी लक्ष वेधले.
हडपसर विधानसभा मतदारसंघात विविध जातींधर्माचे, अल्पसंख्यांक समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने आहेत सातत्याने सोशल मीडियावरून लक्ष्य केले जात असल्याने या समाजातील जनतेच्या भावना दुखावल्या जात असून असंतोषाचे वातावरण तयार होते आहे. आयुष्यमान भारत योजना चांगली आहे .ती राबविण्यासाठी सरकार प्रयत्न करते आहे .परंतु , हडपसर मतदारसंघात या योजनेच्या कार्ड वितरणाबाबत काही प्रश्न समोर आले. हे कार्ड कुणी वितरीत करायचे याची नियमावली स्पष्ट नसल्याने अनेक पुढारी हे कार्ड आपल्या ताब्यात ठेवतात असे समोर आले आहे. आपल्या घरी, कार्यालयात ते कार्ड ठेवतात अनेक ज्येष्ठ नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप होतो. विनाकारण चकरा माराव्या लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. ज्या अधिकाऱ्यांवर या कार्ड वितरणाची जबाबदारी आहे त्यांच्यावर कोणती कारवाई होणार? ज्या पुढाऱ्यांनी कार्ड घरी नेले त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार असा सवालही त्यांनी यावेळी केला.
-मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नवीन शासकीय वसतीगृहासाठी निधी दिला आहे ही चांगली बाब आहे परंतु आत्ता आहे त्या वसतिगृहाची दुरावस्था झाली आहे त्याबाबत काय उपाय करणार आहे. दरवाजे मोडकळीस आले आहे, पुरेसे बाथरूम – संडास नाही, निकृष्ट दर्जाचे अन्न मिळते आहे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. काळेपडळ, फुरसुंगी पोलीस स्टेशनचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे
हडपसर मतदारसंघात पोलीस स्टेशनची संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. काळेपडळ, फुरसुंगी ही माझ्या मतदारसंघात दोन पोलीस स्टेशन मंजूर करण्यात आली आहे. त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी विधानसभेत केली. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची संख्याही वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
मनपाच्या ताब्यात असलेले अनेक भूखंड, मोकळी मैदाने आणि काही महत्वाच्या इमारती यांच्या आवारामध्ये दररोज संध्याकाळ पासून उशिरा रात्रीपर्यंत व्यसनाधीन आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे समाजकंटक अशा लोकांचे अड्डे जमलेले आढळून येतात.ह्या लोकांचा रात्र रात्रभर चालू असलेला गोंधळ,त्यातून निर्माण होणारी भांडणे आणि काही वेळेला गंभीर स्वरूपाच्या मारामा-या मध्ये त्यांचे रूपांतर होणे यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना अत्यंत त्रास सोसावा लागतो आणि सज्जन नागरिकांची कुचंबणा होते.यावर उपाय म्हणून ह्या सगळ्या मैदानांना कुंपण किंवा कुंपण भिंती बांधणे, गरजेचे असेल तिथे सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे आणि हे काम महापालिकेने प्राधान्याने करावे. महानगरपालिकेत कंत्राटी सेवा भ्रष्टाचाराचे कारण ठरत आहे. मर्जीतल्या माणसांना ठेका द्यायचा, त्यासाठी नियमांना बगल द्यायची हे सुरु आहे. हे ठेकेदार नाही तर मक्तेदार बनले आहे. अशी घणाघाती टीका आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी विधानसभेत केली. आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांचे लाड पुरविले जातात. यासाठी खिरापती वाटल्यासारखा पैसा वाटला जातो आहे असेही ते म्हणाले.कचरा वाहतुकीच्या देवदूत गाड्या असो की झाडू वाल्यांचा मुद्दा कंत्राटी सेवा ही पुणे मनपात भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे .
पावसाळी गटारांविषयी कोणते स्पष्ट धोरण आखण्यात येणार आहे का? कोणत्या रस्त्यावर पावसाळी गटार असावे याचे निश्चित धोरण महापालिकेकडे नाही. पाऊस सर्वत्र पडतो पण पावसाचे पाणीदेखील सगळीकडे तुंबते आहे. रस्त्यांची गटार गंगा झाली आहे. नागरिकांना यामुळे प्रचंड मनस्ताप होतो आहे ,अशी भावना आमदार तुपे यांनी बोलून दाखविली.मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेचा बट्टयाबोळ झाला आहे. महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांसाठी १ हजार कोटींची तरतूद आहे. २४ तास पाणी ही तरतूद या अंतर्गत येते. हडपसर मतदारसंघ हा पुणे शहराचा एक भाग आहे. इथे टाक्या बांधल्या पण नळातून पाणी नाही तर हवा येते. पाणी तर लोकांच्या डोळ्यातून येत आहे.अशी व्यथा हडपसरचे आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी मांडली.
हडपसरला मेट्रोला गती मिळावी
स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु विकास आराखड्यात त्याबद्दल काहीही तरतूद नाही. पुण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या मेट्रो मार्गिकेसाठी निधीची आवश्यकता असून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हजार कोटींचा निधी देण्याचे मान्य केले होते . तो निधीही लवकरच मिळावा.
स्वारगेट ते हडपसर आणि पुढे लोणी काळभोर पर्यंत जी मेट्रो मार्गिका आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) सुरू करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने सुरू केले होते. त्याला गती मिळणे आवश्यक आहे. तसेच पुणे – सोलापूर महामार्गावर ही मेट्रो मार्गिका असल्याने नागपूर मेट्रोच्या धर्तीवर ही मार्गिका दुमजली करण्यात यावी ,अशी मागणीही विधानसभेत केली आहे.
चेतन तुपे आमदार, हडपसर विधानसभा