हडपसर (विवेकानंद काटमोरे) – हडपसर परिसरातील वाहतूक समस्येबाबत हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतर हडपसर मधील वाहतूक समस्येवर काही काम होईल असे वाटले. परंतु अजूनही अपेक्षित असे बदल दिसून येत नाहीत. यावर आमदार चेतन तुपे यांनी वाहतूक विभागातील पोलिस अधिकाऱ्यांना हडपसर मधील वाहतूक समस्येबाबत काही देणेघेणे आहे की नाही?, असा सवाल केला. या महत्त्वाच्या विषयांवर आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अधिकारी दुर्लक्ष करतात की काय?, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. तसेच वारंवार सूचना करूनही येथील वाहतुकीचे तीन-तेरा वाजविणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात विधानसभेत हक्कभंग उपस्थित करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
हडपसर मधून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. येथील वाहतूक सुरळीत चालू रहावी यासाठी उड्डाणपूल बांधले आहेत. रस्तेही उपलब्ध आहेत तरी ट्रॅव्हल्स, खासगी बसेस व अन्य वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडी आणि अपघातांना निमंत्रण मिळत आहे. यासंदर्भात आमदार चेतन तुपे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले होते. शहरातील व हडपसर येथील वाहतूक सुरळित सुरू राहावी तसेच अपघात होऊ नयेत यासाठी रस्त्यांच्या बाजूला बेशिस्तपणे पार्किंग केले जाणारे खासगी ट्रॅव्हल्स, खासगी कंपन्यांच्या गाड्यांना शिस्त लावावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.आठवडाभर झाले तरी हडपसरच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या वाहतूक समस्येबाबत वाहतूक पोलीस अधिकाऱयांना काहीच देणेघेणे नसेल तर शहर व हडपसरच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याची चिंता आमदार तुपे यांनी व्यक्त केली. वाहतूक समस्येबाबत वारंवार सूचना करूनही वाहतूक विभागाचे अधिकारी कर्तव्यात कसूर करत आहेत. आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अधिकारी असे वागत आहेत का?, असा सवाल त्यांनी केला. हडपसर परिसरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. परंतु, वाहतूक विभागाचे अधिकारी बेफिकीरपणे वागत असतील तर विधानसभेत हक्कभंग उपस्थित करण्याचा इशारा आमदार तुपे यांनी दिला.
“गेली आठ दिवस येथील खासगी बसेसवर नियमित कारवाई केली जात आहे. बस रस्त्यावर थाबू दिल्या जात नाहीत. इतर वाहतूक ही सुरळीत आहे.संध्याकाळी अवजड वाहने आणि मुबंईवरून येणाऱ्या बसेस यांचा वेळ एकच होतो.त्यावेळी वाहतूक काही काळ संथ होते. तरीही सहा कर्मचारी घेऊन मी स्वतः येथे रात्री उशिरापर्यंत थांबून कारवाई करत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत”.
बाळासाहेब मुर्हे,पोलीस अधिकारी- हडपसर वाहतूक शाखा