कर्जत/राशीन -मी बी आलो आणि सरकारबी आलं. ज्याच्यासाठी मला तुम्ही काम दावलं, तुम्ही म्हंजी सगळ्यांनीच नाय दावलं, तीन वर्षांत येसवडीकर तर नाहीच कर्जत तालुक्याला नीटनेटकं पाणी नाही आलं. पण हरकत नाही, मी पण काही कमी नाही, मी मध्येच अडीच वर्षे झालं की आलो, मी बी आलो आणि सरकार बी आलं, शिंदे-फडणवीस सरकार येताच या भागात पाणी सोडलं, पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचलं की नाही हे पाहायला आज येसवडीत आलो, असे प्रतिपादन प्रा. राम शिंदे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत कुकडीचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. काळे यांच्या हस्ते तालुक्यातील येसवडी पाझर तलावाचे काल (शुक्रवार) जलपूजन करण्यात आले. या वेळी आ. शिंदे बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते शांतिलाल कोपनर, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, दत्ता गोसावी, सुनील काळे, सोयब काझी, तात्यासाहेब माने, बंडा मोढळे, योगेश शर्मा, अंकुश राऊत, जयदीप पिसे, उपसरपंच कृष्णा मरळ, सुभाष सामसे, हिरामण उकिरडे, हनुमंत केदारी, तुषार पिसे, दगडू कांबळे, संदीप कांबळे, ऍड. हरिश्चंद्र राऊत, विलास काळे उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले की, कुकडी जेव्हापासून कर्जत तालुक्यात आली, तेव्हापासून येसवडी पाझर तलाव कुकडीच्या पाण्याने भरला पाहिजे अशी प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा आज संपली. तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. येसवडीकरांचे 20-25 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा मला आनंद आहे. कुकडी प्रकल्पातील ओव्हर-फ्लोच्या पाण्यातून गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील लहान-मोठे तलाव भरून घेतले जात आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सन 2019पूर्वी माझ्याकडून येसवडीचा तलाव भरायचा राहून गेला होता. परंतु लोकांना वाटले की मागच्या तीन वर्षांत तरी भरला जाईल, पण अपेक्षा काही पूर्ण झाली नाही. मी पुन्हा आलो आणि हा पाझर तलाव भरून दिला.