कोलकता – ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आता पश्चिम बंगालची राजधानी असणाऱ्या कोलकताचे मतदार बनले आहेत. त्यामुळे भाजपच्या तिकिटावर ते विधानसभा निवडणूक लढवतील, असे अंदाज बांधले जात आहेत.
तृणमूल कॉंग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य असणाऱ्या मिथुनदांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते स्वत: निवडणूक रिंगणात उडी घेणार की केवळ भाजपचा प्रचार करणार याविषयी तर्क-वितर्क सुरू आहेत. अशात त्यांनी उत्तर कोलकत्यात स्वत:ची मतदार म्हणून नोंदणी केल्याने चर्चांना आणखी जोर आला आहे. मिथुनदा याआधी मुंबईचे मतदार होते. आता कोलकताचे मतदार बनल्याने ते त्या शहरातून विधानसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता बळावली आहे. अर्थात, स्वत: मिथुनदा किंवा भाजपकडून अजूनपर्यंत पत्ते खोलण्यात आलेले नाहीत. मात्र, बंगालमधील यावेळची निवडणूक भाजपने अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्या राज्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी त्या पक्षाने कंबर कसली आहे. त्यातून अनेक चित्रपटताऱ्यांना बरोबर घेऊन भाजपने निवडणूक रिंगणातही उतरवले आहे. त्यामुळे मिथुनदांबाबत उत्सुकता बळावली आहे.