पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्यांसाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेसाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात चार पटीने निधीची तरतूद कमी केली आहे. कार्यशाळेसाठी 25 लाखांची तरतूद यंदा 5 लाखांवर आणली आहे. त्यामुळे प्राध्यापक-प्राचार्य संघटनांतून नाराजी उमटली आहे.
विद्यापीठातर्फे प्राध्यापक-प्राचार्यांसाठी पंचतारांकित रिसोर्टमध्ये दरवर्षी कार्यशाळा घेण्यात येते. नवीन विद्यापीठ कायदा, नवे शैक्षणिक धोरण, नॅक मूल्यांकन, पेटंट, नवे शैक्षणिक निर्णयावर चर्चा व विचारमंथन होण्याच्या दृष्टीने विशेषत: महाबळेश्वर आणि लोणावळा येथे दरवर्षी कार्यशाळा घेतली जाते. विद्यापीठाच्या तीन जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी कार्यशाळा घेण्यास योग्य ठिकाणे असतानाही पर्यटनस्थळी कार्यशाळा घेतली जात होती. त्यामुळे त्याचा खर्चही विद्यापीठावर पडत होता.
दरम्यान, विद्यापीठाचा अर्थसंकल्प दोन दिवसांपूर्वी अधिसभेत सादर करण्यात आला आणि त्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पात कार्यशाळेसाठी 25 लाखांची तरतूद होती. तर, ती आता केवळ 5 लाख केली आहे. त्यामुळे आता कार्यशाळेवर मर्यादा येणार आहे.
तथापि, सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ऑनलाइनद्वारे सर्व वेबिनार होत आहे. अशा परिस्थीतीत कार्यशाळा घेणे संयुक्तिक राहणार नाही. तसेच, करोनामुळे विद्यापीठाचे आर्थिक उत्पन्न घटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कार्यशाळेवर होणारा खर्च कमी करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
प्राध्यापक-प्राचार्यांना वर्षातून कार्यशाळा घेणे आवश्यक आहे. त्यातून शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने कार्यशाळा उपयुक्त ठरते. अशा परिस्थितीत कार्यशाळेसाठी निधीची तरतूद कमी करणे अयोग्य आहे. ही तरतूद वाढविली पाहिजे.
– डॉ. सुधाकर जाधवर, सचिव, प्राचार्य संघटना