सातारा – सातारा जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडूक व विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी 26 हजार कर्मचारी सज्ज झाले आहे. जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आले आहे.
मतदान प्रक्रियेसाठी 21 हजार व मतमोजणी प्रक्रियेसाठी पाच हजार कर्मचारी, असे वर्गीकरण करण्यात आले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व त्या अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी एकाच वेळी एकाच ठिकाणी होणार असल्याने अडीच हजार कर्मचाऱ्यांची जादा नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीच्या कमाल 33 फेऱ्या होणार असून मतमोजणी प्रक्रिया बारा तासांपेक्षा अधिक काळ चालणार आहे.
जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी (दि. 19) सायंकाळी पाच वाजता होईल. मतदान सोमवार, दि.21 रोजी होत आहे. मतदान अवघ्या 48 तासांवर येऊन ठेपल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंधल यांनी सर्व प्रांताधिकाऱ्यांची बैठक घेऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 2562 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून जिल्हा प्रशासनावर ताण पडत आहे. कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुलाबी रंगाच्या पट्ट्या असलेली ईव्हीएम मशीन्स लोकसभेसाठी तर पांढरी पट्ट्या असलेली ईव्हीएम मशीन्स विधानसभेसाठी वापरण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच अधिकारी व सहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन्स हाताळणे, मतदानानंतर मशीन्स सील करणे, या मशीन्स सुरक्षितरित्या जमा करणे, या बाबींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.