पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता
पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागातील पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू केले आहे. गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनमुळे हे काम थांबले होते. हे काम मागील आठ दिवसांपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हे काम हाती घेतले आहे. हे बोगदे सुमारे 9 किलोमीटर लांबीचे असून आठ पदरी असणार आहेत. या मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई हे अंतर सहा कि.मीने कमी होणार असून 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरिडॉर दुरुस्तीसाठी “बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर 30 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी शासनाने 1999 पासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहा पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 कि.मी च्या राहिलेल्या मिसिंग लिंकमुळे मुंबईला लवकर पोहोचणे शक्य होणार आहे.
आठ दिवसांपासून काम पुन्हा सुरू
या प्रकल्पामुळे बोर घाटातील 6 किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. लोणावळापासून सुरू होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्झिट इथे संपणार आहे. मागील चार महिन्यांपूर्वी या कामास सुरुवात झाली होती. पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याची मर्यादा शासनाने घातली आहे. परंतु, राज्य सरकारने 24 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे तेव्हापासून हे काम बंद पडले होते. दरम्यान, राज्य सरकारने लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविला आहे. परंतु, त्यातून काही कामे करण्यास एमएसआरडीसीला मान्यता दिली आहे.