राहाता – राहाता येथील दुय्यम निबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दोन फलक लावण्यात आले आहेत. त्यातील एकावर पत्ता व दूरध्वनी जुना असून, दुसऱ्यावर पत्ता व दूरध्वनी लिहिलेल्या ठिकाणी चिकट पट्टी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे तक्रारदारांना नेमके कुणाशी संपर्क साधावा, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे हे फलक म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयाची नजरचूक की दिशाभूल करण्याचा प्रयत्न, याबाबत चर्चा सुरू आहे.
भ्रष्टाचार रोखण्याकामी व लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकांविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधता यावा, म्हणून या कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक असणारे फलक जनहितार्थ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने विविध शासकीय कार्यालयांत लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांत जनजागृती होत असून, त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात अनेक लाचखोर पकडले गेले आहेत.
नगर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध कार्यालयांत संपर्कासाठी फलक लावलेले आहेत. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनीही जनजागृती करण्यासाठी फलक लावले आहेत. राहाता येथील दुय्यम निबंधक कार्यालयाने लावलेल्या फलकावर मात्र नगरचा दूरध्वनी कोड 0241 असताना या फलकावर 0214 असा लिहिलेला आहे. या फलकावरील एसटीडी कोड व लॅंडलाईन क्रमांक लावल्यास रॉंग नंबर लागून बातमी लीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
एका फलकावर जर नजरचुकीने असा प्रकार घडला असेल, अशी शक्यता वर्तवली तर दुसऱ्या फलकावर दर्शविलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक का झाकून ठेवला, त्यावर चिकट पट्टी का लावली? अशी विचारणा होत आहे. कदाचित या कार्यालयात अतिशय स्वच्छ व पारदर्शी कारभार सुरू असेल, त्यामुळे येथे या कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांकाची आवश्यकता नसावी, असा उपरोधिक सवालही काही नागरिक दबक्या आवाजात करीत आहेत.