नाशिक :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातून मातीचे कलश जिल्हा प्रशानाच्यावतीने दिल्ली येथे पाठविण्यात येणार असून तेथे साकारण्यात येणारे ‘अमृत वाटिका‘ हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणार आहे, असे प्रतिपादन दळवट येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.
सुशोभित केलेल्या मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन करण्यात आले. यामध्ये ज्या आदिवासी बांधवांना शेतजमीन आहे त्यांनी संकल्पनेनुसार कलशामध्ये माती टाकली तर ज्या नागरिकांना स्वतःची शेत जमीन नाही त्यांनी चिमूटभर तांदूळ या कलशामध्ये टाकून आपला सहभाग नोंदवला. दिल्ली येथे निर्माण होणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मे आणि शहीद जवान यांच्या स्मारकासाठी हा मातीचा कलश जिल्हा प्रशासनाकडून जाणार आहे.
केंद्र सरकारने ‘ एक भारत, श्रेष्ठ भारत ‘ या भावनेने दिल्ली आणि ७ हजार ५०० गावांमध्ये देशी आणि स्थानिक वनस्पतींचे उद्यान उभारण्यासाठी ‘अमृत वाटिका’ योजना सुरू केली आहे. ‘मेरी माटी, मेरा देश ‘ या अभियानांतर्गत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतींमध्ये ‘शिलाफलकम’ स्मृती फलकही लावण्यात आले आहेत.
मातीचा कलश घेऊन डॉ.भारती पवार यांच्यासह आदिवासी बांधवांनी पारंपारिक आदिवासी वाद्यांच्या तालात आपली परंपरा सांभाळत लोककलेच्या माध्यमातून नृत्य करत परिसरातून मिरवणूक काढली. यावेळी आदिवासी बांधवांबरोबर राज्यमंत्री डॉ. पवार यांनी देखील नृत्यामध्ये सहभागी होऊन ढोल वादनाचाही आनंद घेऊन हा कार्यक्रम उत्साहात संपन्न केला. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या मोहिमेत सहभागी झाले होते.