श्रीनगर – पीडीपी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना येथील उच्च सुरक्षा असलेल्या गुपकर भागातील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. स्वता मेहबुबा यांनीच ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, मला घर सोडण्याची दिलेली ही नोटीस अपेक्षितच होती.
त्यांनी म्हटले आहे की सदर बंगला जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसाठी राखीव आहे, असे नोटिशीत म्हटले आहे, पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही. माझे वडील जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्यांनी हे पद सोडल्यानंतर सन 2005 मध्ये तत्कालीन सरकारने माझ्या वडिलांना ही जागा राहण्यासाठी दिली होती. त्यामुळे हा राज्याच्या मुख्ममंत्र्यांसाठीचा राखीव बंगला असल्याचा नोटीशीत करण्यात आलेला दावा खरा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने घर खाली करण्यासाठी दिलेल्या नोटिशीला आपण कायदेशीर आव्हान देणार आहात का, असे पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या की, पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही याविषयी निर्णय घेऊ. जम्मू काश्मिरात माझ्या मालकीची अशी जागा नाही त्यामुळे हा बंगला सोडल्यानंतर माझ्यापुढे निवासाचा मोठाच प्रश्न निर्माण होणार आहे, मी बेघर होईल असेही त्या म्हणाल्या.