नगर – शहरातील करदात्यांवर मालमत्ता करात दोन टक्के अग्नीशमन कर आकारण्याबाबत, बुरुडगाव येथील कचरा डेपोत बायो मेन्थाननेशन प्लॅन्ट सुरू करणे, घनकचरा व्यवस्थापन विभागात कचरा संकलन व वाहतुकीसाठी चार चाकी टिपर वाहन खरेदी आदी चार विषयांवर चर्चा होण्यासाठी महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांनी मंगळवारी स्थायी समितीची सभा बोलावण्यात आली आहे.
शहरात मालमत्ता कराच्या तुलनेत नागरिकांना सुविधा मिळत नसल्याची ओरड नागरिकांकडून होत असतानाच महापालिकेने मालमत्ता करात दोन टक्के अग्निशमन कर आकारण्याचा घाट घातला आहे. शहरात 1 लाख 15 हजार कर दाते आहेत. त्यांना वर्षाला 65 कोटी रुपये कर येतो. त्यावर दोन टक्के कर अग्निशमन कर आकारल्यास तब्बल एक कोटी 30 लाख रुपये अतिरिक्त दर वर्षाला महापालिकेला मिळणार आहेत. महापालिकेतील अग्निशमन विभागाची स्थिती अतिशय दयनिय आहे.
शहरात अग्निशमन विभागाचे तीन कार्यालये आहेत. त्यातील एक केडगावचे कार्यालय वाहने व कर्मचारी अभावी बंद करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाकडे केवळ दोन मोठी, दोन छोटी वाहने व दोन दुचाकी आहेत. शहरात मोठी आग लागल्यास ही वाहने अपुरी ठरतात. अशा वेळी जवळील नगरपरिषदांच्या अग्निशमन विभागाची मदत मागितली जाते. ही मदत पोचेपर्यंत आग वाढलेली असते.
मात्र अशा घटना तुरळक होतात. अग्निशमन कर वाढल्यास प्रत्येक मालमत्ता करदात्याला 300 ते एक हजार रुपयांपर्यंत कर वाढ सहन करावी लागणार आहे. बुरुडगाव येथील कचरा डेपोत बायो मेन्थाननेशन प्लॅन्ट वेळेत सुरू करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश आहेत. हा प्रकल्प वेळेत उभा न करता आल्याने मागील ठेकेदाराकडून काम काढून घेण्यात आले होते. आता हा प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. यात पुण्यातील मेल हेम आयकॉस व उर्जा बायोटेक दोन जणांच्या निविदा आलेल्या आहेत.