महापालिकेचे वाहतूक पोलिसांनाही पत्र
पुणे – महापालिकेच्या विकासकामांसाठी रस्ते खोदाईसाठी वाहतूक पोलिसांची “एनओसी’ अर्थात ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याची गरज नसल्याचे आदेश माजी आयुक्त सौरभ राव यांनी काढले आहेत. या आदेशाची माहिती महापालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांना कळवली आहे. तसेच यापुढे केवळ वाहतूक नियोजनासाठी संबंधित ठेकेदाराकडून पोलिसांना सर्व माहिती कळवली जाईल, असे आश्वासनही या पत्रात दिल्याचे महापालिकेचे माजी पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले आहे.
महापालिकेकडून रस्ते विकसन तसेच पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि विद्युतविषयक कामे केली जातात. ही कामे करताना तसेच रस्ते खोदताना वाहतूक वळवण्यात येते. तसेच रस्त्याचा काही भाग बंद ठेवावा लागतो. त्यामुळे या कामांसाठी वाहतूक पोलिसांची “एनओसी’ घ्यावी, अशी मागणी वाहतूक पोलीस उपायुक्तांनी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि शहर पोलिसांच्या झालेल्या बैठकीत घेऊनच कामे करण्यात यावीत, असा निर्णय घेण्यात आला.
गेल्या तीन वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या “एनओसी’ वेळेत मिळत नसल्याने, काम वेळेत न सुरू होणे, वेगवेगळ्या टप्प्यावर काम मान्यतेसाठी विलंब होणे, कामे मुदतीत पूर्ण न होणे तसेच कामासाठी प्रस्तावित तरतूद खर्ची न पडणे अशा अनेक समस्या निर्माण होत होत्या. त्याचा फटका काम न झाल्याने सर्वसामान्यांनाही बसत होता. त्यामुळे दि. 18 जानेवारीला झालेल्या मुख्यसभेत नगरसेवकांनी याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली.
तसेच महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही ही अट रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, माजी आयुक्त राव यांनी जाता जाता याबाबतचे कार्यालयीन आदेश सर्व संबंधित विभागांना काढले आहेत. तसेच या आदेशाची माहिती तातडीने पथ विभागाने वाहतूक पोलिसांना कळवली आहे. त्यामुळे पोलिसांच्या परवानगीसाठी रखडलेली कामे पुढील काही दिवसांत सुरू करणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले.