जया बच्चन यांचे शिवसेनेकडून अभिनंदन

मुंबई – समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या सदस्य जया बच्चन यांनी संसदेत बोलताना चित्रपटसृष्टीचे समर्थन करून या चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याच्या प्रकाराला चांगलेच फटकारले होते. त्याबद्दल शिवसेनेने जया बच्चन यांचे कौतुक केले आहे.

आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात त्यांनी त्यांचे हे कौतुक केले आहे. चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे दुटप्पी आणि ढोंगी आहेत, असेही शिवसेनेने म्हटले आहे. या संबंधात जया बच्चन यांनी घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले आहे.

चित्रपटसृष्टीतील सारेच कलावंत आणि तंत्रज्ञ मादकद्रव्यांचे सेवन करीत असल्याची मुक्‍ताफळे ज्यांनी उधळली आहेत त्यांचीच डोपिंग टेस्ट केली पाहिजे, अशी सूचनाही शिवसेनेने केली आहे.

दादासाहेब फाळके नावाच्या एका महाराष्ट्रीय माणसाने चित्रपटसृष्टीचा पाया रचला. मूकपटाने सुरू झालेला चित्रपटसृष्टीचा प्रवास लाखो लोकांच्या कष्टाने आता शिखरावर पोहोचला आहे. चित्रपटसृष्टीने देशकार्यातही मोठे योगदान दिले आहे.

सुनील दत्त यांच्यासारखे अभिनेते कलावंतांची पथके घेऊन सीमेवरील सैनिकांचे मनोरंजन करीत. मनोजकुमार यांच्यासारख्या अभिनेत्याने कायमच देशभक्‍तीचा पुरस्कार करणारे चित्रपट दिले आहेत. राजकपूर यांच्या सिनेमांमध्ये सामाजिक विषयांना हात घातलेला असायचा, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.