- राष्ट्रीय पक्षी सप्ताह : गरूड, साळुंखी, बुलबुल, रॉबिन, मोरघार निदर्शनास
वडगाव मावळ – वडगाव मावळ, शिरोता व ताम्हिणी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने कल्हाट येथील वनक्षेत्राच्या हद्दीत शनिवारी (दि. 7) सकाळी राष्ट्रीय पक्षी सप्ताहानिमित्ताने गिधाड पक्षी निरीक्षण करण्यात आले. कल्हाट येथील वनक्षेत्राच्या हद्दीत 16 गिधाड पक्ष्यांचे वास्तव्य आहे. गिधाड पक्ष्यासह सर्प गरुड, साळुंखी, बुलबुल, रॉबिन, मोरघार आदी निदर्शनास आले.
महाराष्ट्र शासन वन विभागाच्या आदेशाने 5 नोव्हेंबर पक्षी तज्ज्ञ मारुती चित्तमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त व 12 नोव्हेंबर पक्षी तज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कालावधीत राष्ट्रीय पक्षी सप्ताहाचे आयोजन केले जाते.
मावळ तालुक्यात कल्हाट (ता. मावळ) येथील वनक्षेत्राच्या हद्दीत वडगाव मावळ वनपरिक्षेत्राधिकारी सोमनाथ ताकवले, शिरोता व ताम्हिणी वनपरिक्षेत्राधिकारी महेश पाटील, वनपाल सखाराम बुचडे, व्ही. व्ही. शिंदे, सागर चुटके, डी. एम. डेबंरे, वन्यजीव रक्षक मावळ सदस्य निलेश गराडे, जिगर सोलंकी, अभिषेक मराठे, रौनक खरे, पूजा बर्गे आदीसह वनरक्षक, वनकर्मचारी आदींनी अत्याधुनिक कॅमेऱ्यातून निरीक्षण केले.
यामध्ये 16 गिधाड पक्ष्यांचे वास्तव्य कल्हाट येथील वनक्षेत्राच्या हद्दीत आहे. गिधाड पक्ष्यासह सर्प गरुड, साळुंखी, बुलबुल, रॉबिन, मोरघार आदी निदर्शनास आले.
या वेळी सोमनाथ ताकवले म्हणाले की, कल्हाट येथील वनक्षेत्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर मोकाट रानटी जनावरे वास्तव्यास आहेत. त्यातील मृत जनावरांचे मांस खावून जिवंत आहेत. गिधाड पक्षी संवर्धन व संरक्षणासाठी विभाग पुढाकार घेणार आहे.
वन्यजीव रक्षक मावळ निलेश गराडे म्हणाले की, वन व वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी वनक्षेत्राच्या हद्दीलगत संरक्षक भिंती उभाराव्यात यामुळे मानवी हस्तक्षेप थांबेल, यातून वन व वन्यजीव संरक्षण व संवर्धन होईल.
तसेच मावळ तालुक्यातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ग्लीरीसिडीया नावची वनस्पती असून, त्याचा फायदा वन्यजीवाला होत नसल्याने त्या ठिकाणी फळ व वनौषधी वृक्षांचे रोपण करावे. तसेच वनक्षेत्राच्या हद्दीतील गावे, शाळा, महाविद्यालय व सामाजिक संस्था यांना वनक्षेत्रात वन व वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करावी. सूत्रसंचालन महेश पाटील यांनी केले.