पुणे – उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता होऊन दोन आठवडे उलटले असतानाच पोलिसांना तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागचे गुढ येत्या काही दिवसांत उकलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाषाणकर काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्यानंतर ते कोकणात गेल्याचे कळाल्यावर पोलिसांची पथके कोकणात रवाना झाली आहेत.
पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. तपास योग्य दिशेने सुरू असून काही धागेदोरे मिळाले आहेत. आठवडाभरात पाषाणकर बेपत्ता होण्यामागचे गूढ उकलेल, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते.
पाषाणकर दि.21 ऑक्टोबर रोजी शहरातून बेपत्ता झाले होते. ते कोल्हापुरातील एका हॉटेलात वास्तव्यास असल्याची माहिती तपासात मिळाली. तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी पडताळले. यासंदर्भात पाषाणकर यांच्या कुटुंबीयांकडे चौकशी करण्यात आली आहे.
चित्रीकरण कुटुंबीयांनी पाहिले असून, त्यांनीही दुजोरा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस आयुक्त गुप्ता, गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके पाषाणकर यांचा शोध घेत आहेत. पाषाणकर यांचा शोधासाठी रत्नागिरी, कणकवली, गणपती पुळे येथे पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.