महाबळेश्वर -मुंबईतून पत्नीसमवेत कुरोशी, ता. महाबळेश्वर येथे काल (दि. 9) आलेल्या 55 वर्षांच्या माथाडी कामगाराने घरापासून जवळच असलेल्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. हा कामगार कोव्हिड संशयित असल्याचे गृहीत धरून त्याच्यावर महाबळेश्वर येथील स्मशानभूमीत मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या आधी त्याच्या घशातील स्रावाचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी पाठविण्यात आला.
मालाड (मुंबई) येथील हा माथाडी कामगार मंगळवारी रात्री उशिरा पत्नीसमवेत कुरोशी येथे आला होता. गावात त्याच्या भावाचे छोटे हॉटेल आहे. तेथे दोघांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते.
पत्नी बुधवारी पहाटे झोपेत असताना, हा कामगार उठून बाहेर गेला. पत्नीने सकाळी उठून पाहिले असता, पती तेथे नव्हता. थोड्याच वेळात घरातील लोकांना हा कामगार झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. याची खबर मेढा पोलीस ठाण्यात देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. हा कामगार मुंबईतून आल्याने तो कोव्हिड संशयित असल्याचे प्रशासनाने गृहीत धरले होते. त्यामुळे सर्व खबरदारी घेऊन त्याचे शव महाबळेश्वर येथे आणण्यात आले. तेथे त्याच्या घशातील स्रावाचे नमुने घेऊन पत्नी व मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महाबळेश्वर पालिकेचे मुख्य लिपिक आबा ढोबळे व बबन जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार पार पाडले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव शहा व डॉ. आदर्श नायर उपस्थित होते.